मानवतेच्या शोधात........


माणसाला होऊ नयेत "माणसाच्या जखमा", हे वाक्य अलीकडेच वाचण्यात आलं....पण आजच्या या कलीयुगात अगदी हेच बघायला मिळतं, अर्थांत काहींच्या वागण्यामुळे मनाला खोलवर जखमा होतेय. हळूहळू जग बदलत चाललंय, परिस्थिती बदलत चाललीय, थोडक्यात सांगायचं झालं तर माणसाची version देखील बदलायला लागलीय, हे बदल स्विकारतो हो आम्हीही; परंतु ते माणूसकी ला लाजवणारे नको तर माणूसकी ला उठवू पाहणारे अन् प्रत्येकाच्या मनात माणूसकीची ज्योत जागी करणारे असावे. पण हे काही बदल मनाला अगदी न पटणारेच आहेत. त्यातीलच एक बदल माणूसकीला विसरत चाललेली ही पिढी नव्हे तर सोशियल मिडीयात अगदी सोशिक झालेली ही पिढी. सोशियल मिडीया वापरावा.... परंतु तेव्हा समाजात काय चाललंय आणि आपण त्यासाठी "मदतीचा एक हात" करून कसे हातभार लाऊ ही जाणीव मात्र भरभरून असायला हवी.

एका हातात मोबाईल आणि दुस-या हाती चहा नि पहाटेची ती सोनेरी वेळ; फेसबुकवर अपडेट बघत होते, अचानक एक पोस्ट समोर आली जी मनाला सुन्न करणारी, मनाला हादरे बसवणारी आणि कुठेतरी माणूसकीला शोकांतिका आणणारी ती पोस्ट होती. एका दृष्यात चक्क पावसाचा आनंद घेत भर रस्त्यात आनंदाने जल्लोष करणारी माझी तरूणपिढी होती, बघताना असं वाटत होतं कि समाजभान पायी तुडवलेली ती होती, हे सर्व करत असताना अगदी एम्बुलेंस चा आवाजही त्यांच्या कानी न पडणाराच. यात जवळपास दिडशे - दोनशे जणं असतील पण काळवेळ न पाहता मनसोक्त आनंदाने गाणे गात नाचणारी होती‌. आणि याच्याच अगदी विरुद्ध दुसरीकडे माझी तरूणपिढी पण ध्येयाने झपाटलेली, माणूसकीची जाणीव असणारी, समाजभान ठायीठायी असलेली..... "खरी युवापिढी". या दृष्यामधे व्यक्ती संख्या कमी(बोटावर मोजण्याइतपत) पण दृढनिश्चयी असल्याने पूरात अडकलेल्या पेशंटला बाहेर आणण्यासाठी डोळ्यात तेल ओतून भल्या मनाने ती अविरत प्रयत्न करत होती. 

एकेक पाऊल पुढे टाकत चालत राहीलं आणि दृष्टी थोडी रोजच्या जगण्यामधे टाकली ना तर कळायला लागेल "जगण्याचा खरा अर्थ".....!! आजकाल स्वार्थासाठी तर सर्वच जगतात हो आणि ते जगायलाही हवं; परंतु त्यातूनही थोडा वेळ काढत समाजाला ही बहाल करावा कारण समाज हा माझं एक कुटुंब आणि मी जबाबदार घटक म्हणून जेव्हा बघायला लागू तेव्हा अगदी क्षुल्लक कारणांवरून निराशेच्या वाटेने जाणारे आपणही आनंदाचा उत्सव साजरा करायला लागू हे मात्र तेवढंच शाश्वत, फक्त बघण्याची दृष्टी आणि त्याला सत्कार्याची अन् माणूसकीची सांगड मात्र नक्की असावी. 

जसा मातीच्या घराला सिमेंटचा गिलावा लागला पण माणूसकी ला आळा पडला आणि ही कुठंतरी संपुष्टात यायला लागलीय आणि म्हणूनच कधी कधी अन् ब-याचदाही मनाला प्रश्र्न पडतो, "माणूसकी या जगातून संपून तर नाही ना जाणार..??" मग हळूच डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं आणि डोळ्यांसमोर उभी राहतात ती माणसे जे आपलं सर्वस्व समाजासाठी वेचत आहेत, उभी राहतात साक्षात परमेश्वराचे रूप जे एकीकडे कुटुंब आणि त्यांची जबाबदारी आणि दूसरीकडे ज्यांच्याकडे काहीही नाही शिवाय प्रेमाचे दोन शब्द आणि मायेचा हात असलेली गरजू अन् होतकरू लोकं आणि अशाप्रकारे हे दोन्ही अगदी तंतोतंत सांभाळून घेणारी भलीमाणसे नि मला म्हणायला आवडेल ते म्हणजे "देवमाणसे" आणि माणूसकिला पुन्हा नवं बळ येईल हा आशावाद मनी संचारतो. 

काही प्रसंग वाचताना अक्षरशः खेद वाटतो कि काय चाललाय हे माझ्या समाजात, माझा देश माझं राज्य कुठं चाललंय....?? कधी कधी तर माणूस कि उपमाही शोभत नाही कारण प्राण्यांसारखं वागणं त्यांचं आम्हाला लाजवणारंच असतं. खिशात पैसे, हातात महागडा मोबाईल, पायात चांगल्या कंपनीची चप्पल आणि तोंडांत खर्रा नाहीतर पान पण प्रेमाचे दोन शब्द अशांच्या तोंडून कधीच पाहीलेली नाहीत कारण ही फक्त दिखावा करण्यात दिसतात हो, स्वत:चं बाह्यसौंदर्य नटवण्यात आणि त्यावर पैसा उधळणारी ही काही अवलिया त्यांना समाजात चाललेली प्रश्न तरी कुठं दिसणार हो त्यांना.....यात मुलीही तेवढ्याच पुढे. आणि लहान लहान गोष्टींची तक्रार करायला निघतात मग ही, पण रस्त्याने अनवानी चालणारी, भुकेने तडफडणारी लहानगे, दोन रूपयांसाठी याचना करणारी म्हातारी माणसे ह्यांना दिसून लक्षात येत नाही हीच भलीमोठी खंत. कारण म्हणतात सगळ्यात बेभरवशाचा प्राणी असतो तो म्हणजे "माणूस" पण तो इतरांना किती सहजासहजी दूषणं देतो, प्राण्यांनाही तो मारायला,दूषणं द्यायला भीत नाही. प्राण्यांना उत्तरं देता येत नाहीत म्हणून, नाहीतर त्यांनीही माणसाच्या विश्वासघाताचे अमानवीयतेचे किती तरी पुरावे सादर केले असते.....!!

"एखाद्या समस्येवर काम करायचं झालं तर एकाच रेषेत विचार करून चालत नाही, त्यासाठी त्या समस्येच्या खोलवर जाणंही तितकंच महत्त्वाचं असतं; जेवढं त्या समस्येला जाणून घेणं....!!" आणि आजची मूळ समस्या जी आहे ना ती दुसरी तिसरी काही नाही हो_________समस्या ही माणूसकीचा अभाव. त्यानंतर याचं मुळ समजून घ्यायला गेलो तर कळेल कि समाजभान आणि यांच्याही खोलगर्तेत गेलो तर उद्भवेल एक कारण ते म्हणजे सोशियल मिडियातच गढून गेलेली ही तरूणपिढी, फक्त तरूणपिढीच का...?? तर उत्तर येईल नाही तर असंख्य पालकवर्ग ही. ज्यामुळे अनेक प्रश्न समोर येताहेत तेही आपल्यामुळेच पण दोष देतो आहे समोरच्याला, दोष देतो आहे समाजाला. एकंदरीत बघायला गेलो तर एकच खंत वाटते आणि ही खंत एका प्रश्नाला जागं करते तो प्रश्र्न हाच______"गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी...!!"

"वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे,
पुस्तकांतून भेटलेली माणसे गेली कुठे....!!"
ताकद असते हो आपल्याला फक्त तिला बाहेर आणणे आपलं काम आहे. ही ताकद बाहेर काढत माणूसकिचा झेंडा आणि ती तत्वे मनामनांत रूजविणारी ही माणसे या जगात कायम आहे जी माणूसकी ला उर्जा देत सदासर्वकाळ मानवतेचे कार्य करत असतात. अशाच थोरामोठ्यांना माझा छोटेखानी मानाचा मुजरा. ही भलीमाणसे ठामपणे त्यांच्याकार्यातून सांगतात कि नाण्यालाही दोन बाजू असतात जे सिद्ध करावं लागतं नाही. अशाचप्रकारे या समाजातही दोन प्रकारची माणसे असतात जी त्यांच्याच कार्यातून दाखवून देतात कि चांगल्या गोष्टी घडायला जरी वेळ लागत असला तरी त्यांचा प्रभाव हा शेवटपर्यंत टिकून राहतो. कारण याच भल्या माणसांना माहीती असतं "कोणतीही गोष्ट साधायची झाली तर त्यासाठी संघर्ष करणं अटळ असतं...!!" आणि हेच ते करत असतात सदाबहार,Hats off to them as well to their Work...!! 

सरतेशेवटी आपल्या चांगल्या कार्याला हातभार लावायला ही अनेक हात पुढे येतील फक्त गरज आहे ती मनामनांत दृढनिश्चय आणि समाजभानाचे बीज मनामनांत रुजविण्याची आणि त्याला माणूसकी नावाचं अविसश्वनीय असं खतपाणी देत त्याला बहरू देण्याची.


_भाग्यश्री उमेश काळे

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........