शब्दांची दुनिया......फार फार न्यारीच गं बय्या....!!


शब्दांची दुनियाच न्यारी बघा अगदी.....
कमी बोललं तर तिकडूनही म्हणणार, थोडं जास्त बोलायला लागलो तरीही म्हणतील....पण असो शेवटी हे मात्र ध्यानात असायला हवं, कारण organiser हे आपणच आहोत. कुठे काय बोलायचं...?? हे जरी जमायला लागलं ना तरी पुरेसं आहे हो सुखी जीवन जगण्यासाठी.

दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या एका मित्रासोबत सहज बोलणं झालं. बोलता बोलता एकमेकांची विचारपूस केली, मग थोडं पुढे जाऊन मीच त्यांना बोलले, कि मला खुप भीती वाटते राजे हो बोलण्याची, भीती वाटते कि, माझ्या शब्दांमुळे कुणी दुखावलं जायला नको, म्हणून सदैवच विचार करत बोलण्याचा आग्रह असतो माझा...माझ्या स्वत:शीच. खुप कमी बोलण्याचा प्रयत्न असतो माझा नेहमीच; पण तरीही असं माझ्याशीच का होत असावं....?? मी सहज जरी बोलले, थोडी मस्करी काय केली...?? पण त्या बोलण्याचं____अगदी सहज बोलण्याचंही कुणाला वाईट वाटतं आणि दोष मी फक्त स्वत:लाच देत बसते नि ती व्यक्ती निरोगी अन् मी रोगी बनून जाते..!! थोडक्यात सांगायचं झालं तर ती समोरची व्यक्ती विसरून जाते; पण माझ्या डोक्यात तेच चालू राहतं, कि बाबा रे माझ्यामुळे त्या व्यक्तीचं मन दुखावलं गेलं, माझ्यामुळे ती व्यक्ती दुखावली गेली...!! माझी ही सर्व बडबड तो निवांतपणे ऐकत होता....आणि हळूच तो बोलायला लागला____

"हे बघ राधे...!! तु असं कधी बघितलंस का..?? जीभ आणि त्या बत्तीस दातांचं कधी भांडण झालंय म्हणून, कधी बघितलं का त्या बत्तीस जणांमध्ये जीभ एकटी वेगळी पडली म्हणून..!!" हो मान्य आहे म्हणा कि एखाद्या वेळेस ती दातांमध्ये थोडी जखमी ही होते, पण त्यात तेव्हा चुक मात्र ही आपलीच असते ना..कि आपण कुठेतरी वेगळ्याच दुनियेत बेधुंद झालं असतो, कोणत्यातरी विचारांच्या घोळक्यात अडकून बसलो असतो, अगदी तेव्हाच. परंतु ऐरवी, ती बिचारी प्रेमाने नांदत असते त्या बत्तीस जणांमध्ये. आपण जे ठरवतो तेच ती बोलते, कारण शेवटी आपणच चालक आहोत तिचे, म्हणून काय बोलावं हे मात्र विचार करूनच बोलावं अगदी. आणि हक्काच्या व्यक्तीजवळ तर दिलखुलासपणे बोलावं. पण हो...!! एक मात्र ध्यानी ठेव तु जर योग्यच बोलली असेल तर तेव्हा हा विचार करत नको हं बसू कि माझ्यामुळे त्या व्यक्तीला त्रास झाला, त्या व्यक्तीने कदाचित ते चुकीच्या हेतूने घेतलं असावं. कारण प्रत्येकाचा दृष्टीकोन हा निराळाच, त्याला नाही बदलवू शकत पण एकच करू शकतो, ते हेच कि बोलताना अगदी नियंत्रण ठेवून बोलावं, वडीलधार्यांचा आदर असावा. बस्स एवढंच अगदी...ज्याचे त्याचे विचार आहेत. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्यासोबतच विचार स्वातंत्र्य देखील आहेच.

"शब्द म्हणजे कस्तुरीचा चांदणचुरा....!!" अलीकडेच हे वाक्य ऐकण्यात आलं. खरंय म्हणजे शब्दांनीच दुनिया चालते असंच वाटतं कधी. कारण काहीही असो वा कुठलंही नातं असो त्यात संवाद महत्त्वाचा असतो, ज्यामुळे नात्याला अजून बहार येतो. शेवटी बोलण्यातही सुस्वर असावेत. नाहीतर असंही म्हणता येतं...."कि इथे जे बे अक्कलेचे कांदे बसलेय, त्यांनी जेवण करून घ्यावं" आणि असंही म्हणताच येतं, "जेवण तयार झालंय, या बघू जेवायला....!!" आपल्याला जरी माहीत नसलं तरीही आपण जे बोलतो ते सर्व रेकॉर्ड होत राहतं डोक्यात, म्हणून बोलताना सावध राहावं माणसाने. 

शब्दाने शब्द वाढत जातो आणि मग लयास येतं "भांडण", फार फार वाईट सवय हो आपल्याला कुणी एखादा शब्द कठोर बोलला कि पचणीच पडत नाही ना आपल्याला, मग आपणही कठोर शब्द वापरायला लागतो; पण हे मात्र ध्यानी असावं, समोरचा जर कठोर शब्द वापरायला लागला तर आपण केवळ नि केवळ सौम्य शब्दच वापरावीत म्हणजे भांडणं होणार नाहीत आणि आपण रोगी होण्यापासून वाचू अर्थांत होणार्या त्रासापासून. 

प्रेममय डीलिंग असावं बोलण्यामध्ये जेणेकरून समोरच्यास ही अर्ध दु:ख नाहीसं झाल्यासारखं वाटायला लागेल, म्हणजे ते बोलणं या हृदयीचं त्या हृदयीच असावं, अगदी मनाचं मनापासून.....!! कारण शब्द ही लक्ष्मी आहे हो, मग आपण ते मोजून मापून का नाही द्यावी बरे.....?? पैसे जसे चोखपणे आपण सांभाळत असतो मग तसंच अगदी शब्दांची किंमतही जाणायला हवी माणसाने. जर कुणाबद्दल चांगलं बोललं जातं नसेल तर वाईटही बोलूच नये. थोडक्यात सांगायचं झालं तर कुणाविषयी निंदा करू नये. आपण जरी त्याच्याविषयी त्याच्या मागे बोलत असू पण हिशोबवहीत ते संपूर्ण हिशोब लिहीला जातो बरं का...!! आपलीही कुठेतरी कुणीतरी निंदा करत असावं. शेवटी मनातील भाव हा चांगला असायला हवा, हेच प्रत्येक गोष्टीचा उगम आहे. सकारात्मक राहायचा प्रयत्न असावा माणसाचा जे बोलण्यातही दिसून यावा. 

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........