माया शेतकरी बाप राब - राब राबतो आहे......

तो शेतकरी बाप माया
काया मातीसोबत हिरवे सपान पाहतो आहे,
ऊन-वारा-पावसात काबाडकष्ट करीत माया बाप राब-राब राबतो आहे,

अधूनमधून जमीनीशी घट्ट नाळ जुळूनही सुटते आहे,
निसर्गाची साथ त्याले कधी मधी लाभते आहे,
पावसाची जोरदार कळ लागत मधीच तो चाटही देतो आहे,
पण तरीही माया शेतकरी बाप राब राब राबतो आहे,

कायी माती हेच जणू सर्वस्व मानत त्यात तो सोनं उगवतो आहे,
निसर्गाने तोंडाशी आलेला घास गिळल्याने जसा उर फाटतो आहे,
अगदी तसंच अंगातली बनियान चिंध्या चिंध्या होईपर्यंत घालतो आहे,
पण तरीही माया शेतकरी बाप उरी हिरवे सपान बाळगत राब राब राबतो आहे,

वावरात जायचा आन गावाले जाचा बुट एकच हाय नि तो ही भोकं पडेस्तोवर वापरतो आहे,
चालताना ना त्याले काट्याकुट्यांची भीती पण लयी पीक व्हावं ही एकच मनात नीती घेऊन तो लढाई लढतो आहे,
कधी स्वत:शी तर कधी त्या कृषि केंद्रावाल्याशी,
कधी त्या निसर्गाशी आन शेवटी त्या मुर्दाळ नि भिकारचोट व्यापार्यांशी,
पण तरीही माया बाप रक्ताचं पानी करत राब राब राबतो आहे,

जसा कि आभायात पाहते क्षणी तारा तुटून पडावा आन ती एक इच्छा पूरी होत धनधान्याचा कधी भरमसाठा होतो आहे,
निसर्गानं साथ देल्ली त ही कायी माती साथ देणार नाय, अन् जमीनीने साथ देल्ली त पीक साथ देणार नाय, अन् अशात माया बापाचा चाललेला हा एकतर्फी प्रेमप्रकरणाचा संसार आहे,
पण तरीही थकत-भागत, कन्हत-कन्हत माया बाप धनधान्य पिकवतो आहे,

सोन्याहूनही अधिक निखारलेलं ते धनधान्य आखेर लिलाव त्याचा होतो आहे,
मंग मलेही म्हणा वाट्टे त्या व्यापार्याईले,
"अबे जरा त सरम करा लेकहो..!!" 
माया बापाचं रक्त त्या धान्याच्या कणांकणांत साठलं आहे,
डोळ्यांत दुःखाचा पसारा असून तरीही माया शेतकरी बाप हळूच हुंदका गियत हसतो आहे,
सार्याईच्या भविष्याचा विचार करीत माया बाप राब राब राबतो आहे,


-भाग्यश्री उमेश काळे

Comments

  1. अतिशय सुंदर सखे




    अप्रतिम





    अगदी सोप्या आणि सरळ शब्दात शेतकऱ्यांचा भावना मांडल्या आहेत..


    खुपचं छान....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........