अनमोल देणं हे निसर्गाचं....!!

                   


   जग हे विविधरंगांनी नटलेलं आहे. अनेक प्रकारचे झाडं - झुडपे आहेत. शेकडो फळे - फुले या निसर्गामध्ये अस्तित्वात आहे, ज्यामधील काहींची माहीती आपल्याला नसेल कदाचित. हा निसर्गच नव्हे तर या निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला सदैव प्रेरित करित असतो. जरा निसर्गाकडे थोडं डोकावुन बघितले असता व आत येते, निसर्गातील प्रत्येक जीव हा जगण्यासाठी सतत धडपड करित असतो असं लक्षात येतं. म्हणुनच कधीकधी असं वाटायला लागतं कि, एकप्रकारे तेच आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगत आहे जणू, जर आपल्याला उत्तम जीवन जगायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल.
                     ही एक छोटीशी गोष्ट आहे, एकदा काय झाले, एका जंगलात आग लागली होती. रानातील सर्व प्राणी,पक्षी हे सैरावैरा पळत सुटले. एवढंच काय जंगलाचा राजा सिंह हा देखील आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. पण एक चिऊ ताई मात्र चोचीत पाणी घेऊन त्या आगेवर टाकत होती. हेच चित्र सिंहाने देखील बघितले आणि तो चिऊताईला विचारु लागला, अगं ये चिऊताई हे तु काय करतेस? त्यावर तिने उत्तर दिले, मी त्या लागलेल्या आगीवर पाणी टाकून ती विझवण्यासाठी प्रयत्न करतेय. मग सिंह म्हणाला, "अगं चिमणे तु केवढी, तुझा जीव केवढा, जराही आगीची असं लागली तर मरून जाशील. ते सोडून दे नि स्वत:चा जीव वाचवणं आधी." त्यावर चिऊताईचे हे गोड बोल, " हे सर्व मलाही माहीत आहे; पण जेव्हाही या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव हे आग लावणार्यच्या यादीत  नसू्न, आग विझवणर्याच्या यादीत असेल...............!"
                       वास्तविक पाहता पाण्याला रंग नाही, रुप नाही; पण उन्हाने तापलेल्या जमिनीवर पडल्यावर अख्या जमिनीचे रुप पालटून टाकतो, हे मात्र खरंय. पावसाळा सुरू झाला की, चोहीकडे हिरवळ पसरते, जणू असं वाटायला लागते कि, पृथ्वीने जणू काय हिरवा शालू परिधान केलाय. उन्हाळ्यात उन्हामुळे सर्वजण त्रासुन जातात; परंतु एकदा पावसाच्या सरी पडल्या कि, मातीचा सुगंध दरवळतो, सगळीकडे गारवा पसरतो. वृक्ष हिरवी पाने धारण करतात. हे अद्भुतरम्य चित्र डोळ्यांत मावेनासे होते.
                       विविध गोष्टी आहेत ज्या आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिकू शकतो. फक्त दृष्टीकोन बदलावा लागेल. बघण्याची शैली देखील बदलावी लागेल. कारण जग हे आपल्याला तसंच दिसतं, जशी आपली दृष्टी आहे. बर्याचदा आपण दु:खी असल्यास आपल्याला हे सुंदर जग ही रटाळवानं वाटायला लागतं; पण जर त्या दु:खातुनही आनंद काय हे शिकलो, तर कळेल की खरा आनंद काय असतो ते.
                        कुणाकडून काय घ्यावे किंवा काय शिकावे हा प्रश्नच आहे. कारण या पृथ्वीतलावरील अगदी लहानात लहान जीव काहीतरी वेगळं शिकवून जातो, कधीकधी ते आपल्याला कळतही नाही. मुंगी साखरेचा दाना वेचत शिस्तीने मार्गक्रमण करत असते. अगदी छोट्याशा जीवात शिस्त आहे मग आपल्यात का नाही? हा प्रश्र्न समोर उभा राहतो. कारण शिस्त ही एक अशी सवय आहे, जी सदैव मनुष्याला आपल्या क्षेत्रात निष्णात होऊन त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते. एखादं छोटंसं रोपटं ; पण तेही सिमेंटच्या भिंतीमधून बाहेर पडते. वास्तविक पाहता ते रोपटं जरी नाजूक असलं तरीसुद्धा त्याने जगण्याची जिद्द सोडली नाही. त्याचप्रकारे कुठलीही गोष्ट साध्य करणे हे सोपं नाही पण अशक्य असं देखील नाही. त्यासाठी खुप मोठी इच्छा शक्ती गरजेची आहे. मेहनत, जिद्द हेदेखील महत्त्वाचे असतात.

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........