"गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी..........!"
सांगताना खुप अभिमान वाटतो कि, आम्ही विज्ञानयुगात नव्हे तर इंटरनेटच्या युगात जीवन जगत आहोत; पण काय ? खरं सांगायचं झालं तर याच इंटरनेट मुळे जग खुप जवळ आले आहे; परंतु कुठेकुठे याने तर जांगडबुत्ताच केलाय. जरी इंटरनेट मुळे लोक जवळ आले असतील पण तेवढीच ती मनाने दुरावली गेली आहे, दूर लोटली गेली आहेत.
हळूहळू काळ बदलत चाललाय आणि बदलत चालली आहे ती परिस्थिती. बघता- बघता मातीच्या घराला सिमेंटचा गिलावा चढलाय नि माणसाच्या मनात असलेल्या माणूसकीलाच कलंक लागलाय जणू.माणसाच्या रगांरगांत ओसंडून वाहणारा माणूसकीचा झराच आटलाय. आपलं पोट भरल्यावर दुसर्यांचंही पोट भरावं हा तर पक्ष्यांचा एक धर्म आहे; पण हा माणूस नावाचा प्राणी! हा तर केव्हाही आपलंच पोट भरायचा विचार करतो नि म्हणूनच आपल्या अवतीभवती इतर लोकही वास्तव्यात आहे, ही जाणीवच नसते तर भास कोठुन येणार? कुणास ठाऊक?
एकीकडे बघितले तर मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे; पण दुसरीकडे तर माणसाच्या मनालाच ग्रहण लागले. याच विज्ञानवादी मानवाने नद्यांवर, नाल्यांवर बंधारे बांधून पाणी अडवले आहे; परंतु माणसाच्या मनात अस्तित्वात असलेला माणुसकीचा झराच आटलाय, हे खरंय. एका डोळ्याने बघितले तर काय? समुद्र देखील त्याने काबीज केलाय पण काय? आधी तर याच मानवाकडे भरभरून असलेला माणुसकीचा ओलावाच संपुष्टात आलाय जणू, नि म्हणूनच म्हणतात की,या दुनियेतुन माणुसकीच हरवलाय. तो माणुस आपल्याला पुन्हा जिवंत करावा लागेल जेणेकरून या पावन भुमीवर पुन्हा जन्म घेणार ती म्हणजे 'माणुसकी '..............!
कधीमधी एखादा अपघात होतो आणि बघणार्याच्या डोळ्यांनी चक्क दिसतंय की, ती व्यक्ती आपल्याकडे मदतीसाठी याचना करतोय, मदतीची हात मागतोय पण त्याही आधी त्याला एकच दिसतंय ते म्हणजे मोबाईल उघडून घडलेल्या घटनेची शूटिंग घ्यायची कारण बघणार्यांना एवढंच, त्यांची धडपड फक्त यासाठी की ही न्युज कोण लवकर पोस्ट करतंय. कारण इथे कुणाच्या जीवाची पर्वा नाही. अहो! हाच माणूस आता खुप निर्दयी झाला आहे. ज्याला आता प्राणी ही उपाधी देखील लाजवणारी आहे.प्राणी जरी असले तरी त्यांच्यात मदतीची भावना ही आहेच शेवटी. म्हणुनच तर बर्याचदा बातम्या ऐकायला आणि वाचायला मिळतात. अमानवीय क्रृत्य घडताना दिसत आहे. याच माणसाच्या निर्दयी पणामुळे निर्भया, कोपर्डी सारखे प्रकरण घडतात.
खरंतर माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाशिवाय एकटा राहू शकत नाही.माणूस या पृथ्वीतलावावरील सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे.तरीदेखील तो इतर प्राण्यांपेक्षा काही गोष्टींमध्ये कमकुवत आहे. कारण तो पक्ष्यांप्रमाणे उडू शकत नाही, माश्यांप्रमाणे पाहू शकत नाही, घोड्यासारखं अधिक वेगाने धावता येत नाही; तरीदेखील याच मानवाने बुद्धीला विज्ञानाची जोड देऊन विविध शोध लावले आहेत. दैनंदिन जीवनात अनेक भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने मानवी जीवन हे खुप सुंदर आणि सुखमय झाले आहेत.
पण नेमकं " गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी......!" असं का म्हटलं गेलं असेल....... कारण माणसांच्या मनात अस्तित्वात असलेली माणुसकीची हिरवळच नष्ट झालीय नि नष्ट झाला तो माणूसकिचा तेजोमय झरा. संपुष्टात आली ती आपुलकी, लोप पावली ती माया. नि म्हणूनच कधीकधी वाटते कि, माणूस हरवलाय....!
आज बघितले तर रोज कितीतरी अन्न वाया जात आहे आणि म्हणूनच तर कचराकुंडीत कचरा कमी नि वाया गेलेले अन्नच जास्त दिसून येते, हे अन्न फेकताना जराही त्यांच्या मनात हा विचार येत नसेल का? फुटपाथवर कितीतरी मुलं ही उपाशी झोपत असेल, भुकेने तडफडत असेल. पण नाही........! कारण त्यांच्यातील माणुसकीच गायब झाली आहे. आपलं पोट भरल्यावर पूर्वी वाटीभर भाजी शेजार्यांना देण्याची परंपरा अस्तित्वात होती; पण ती आता मानवात असलेल्या स्वार्थीपणाला भिऊन खुप दूर पळून गेली आहे.
चला तर मग गर्दीत हरवलेल्या त्या माणसाला शोधू या......! आणि माणुसकीचा जन्म पुन्हा घडवून आणू या.ज्यामुळे या विश्वाचा नक्कीच कायापालट होईल, हे मात्र खरंय.
Comments
Post a Comment